राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या
भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होती चोऱ्या
दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या
जाता त्या महाला मज्जाव शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या
महाली मऊ बिछाने कंदील शामदाने
आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या
Comments
Post a Comment